top of page

रिमझिम धारा (काव्यसंग्रह)प्रस्तावना - २प्रा. मधुकर एरंडे (साहित्यिक)

काही व्यक्ती, काही घटना, काही प्रसंग अंत: करणाच्या खोल कप्प्यात मोरपंखाप्रमाणे घर करून राहतात. त्यापैकी माझे स्नेही डॉ. प्रविण डुंबरे यांनी माझ्या अंत:करणात कायमचेच घर केले आहे. त्याला कारणही तसेच घडले. त्यांचा 'मोरपंखी' हा पहिला काव्यसंग्रह मनापासून मनापर्यंत वाचला आणि मी भारावून गेलो. 'मोरपंखी' हा त्यांचा कवितासंग्रह नितांतसुंदर आहे. कवितासंग्रहात विषयांची विविधता आहे.






वैविध्यपूर्ण कविता हे या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.


प्रविण डुंबरे जरी पेशाने डॉक्टर असले तरी त्यांचा पिंड साहित्यिकाचा आहे. साहित्य विश्वातील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 'शिवांजली भूमिपुत्र सन्मान पुरस्कार -२०२४', वर्ल्ड व्हिजन संस्था, मुंबई यांचा 'प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार -२०२४',

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक यांचा, 'नॅशनल एक्सलन्स अवाॅर्ड पुरस्कार -२०२४', मराठी साहित्य मंडळ, ठाणे यांचा 'साहित्यभूषण राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार' इ. हे त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांच्या लोकाभिमुख साहित्य संस्कृतीचा गौरव आहे.


डॉ. प्रविण डुंबरे यांना सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात दडलेले त्यांचे कविमन त्यांना स्वस्थ बसू देईना. यातूनच त्यांच्या 'रिमझिम धारा'या दुस-या

काव्यसंग्रहाचा जन्म झाला. 'रिमझिम धारा' या कवितासंग्रहामध्यें विविध विषयांना स्पर्श केला आहे. त्यामुळे हा कवितासंग्रह सर्वस्पर्शी झाला आहे. निसर्ग हा त्यांचा आवडता विषय.


'रिमझिम धारा' हा कवितासंग्रह म्हणजे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न.


हा कवितासंग्रह म्हणजे निसर्गाचे नितांतसुंदर गीत आहे. गोमतंक कवी बा. भ. बोरकर म्हणतात,

"जेथे हिरवळ आणिक पाणी

तेथे स्फुरती. मजला गाणी."


त्यांच्या काव्यसंग्रहात निसर्गाचे प्रतिबिंब पडले आहे. 'रात्रीची तू रातराणी '

पाऊस धारा, आला पावसाळा, रिमझिम धारा', मेघ मल्हार, श्रावणधारा, निसर्ग, पावसात भिजायचे, सजवू धरती, नटली धरा, सांग तू पावसाला इ. कविता निसर्ग वर्णनपर आहेत.


'रात्रीची ती रातराणी 'ही रचना अतिशय आशयघन व अर्थपूर्ण आहे. रात्रीच्या समयी

मंद गंध पसरविणारी 'रात्रीची ती रातराणी 'ही खूपच अप्रतिम व नितांत सुंदर कविता आहे. रातराणीची फुले रात्रीचीच फुलतात न खूप सुरेख सुगंध देतात. तरल भाव... भावनांचे मनोज्ञ दर्शन रात्रीची ती रातराणी या कवितेत घडविले आहे. रातराणीचे वर्णन करताना कवी म्हणतात,

"फुले लांब दांड्याची

निशा होताच बहरती

नक्षत्रातील चांदण्या

झाडास जशा लगडती."

किती सुंदर कल्पना!

या ओळी म्हणजे या कवितेचा कळस आहे.


'आला पावसाळा'या कवितेत पावसाची चाहूल लागताच बळीराजा सुखावतो,आनंदतो

प्रस्तुत कवितेत कवी म्हणतात,

"पियू पियू आवाजात,

चातक ओरडला

मेघ सावळे बघून

शेतकरी आनंदला."


'रिमझिम धारा' हे शीर्षक अगदी यथायोग्य कविता संग्रहाला दिलेले आहे. पावसाने अवनीचे रूपडं आता पालटेल याचें वर्णन करताना कवी म्हणतात,

"सुकलेल्या अवनीचे

रूप आता पालटेल

पिके डोलती शेतात

शालू हिरवा नेसेल."


श्रावण महिना सर्वांचा आवडता. व्रतवैकल्यांचा, सणांचा, श्रवणसरींचा महिना.

"आला श्रावण श्रावण,

येती पावसाच्या सरी,

चिंब वसुंधरा ओली,

खेळ खेळती श्रावणसरी."

'श्रावणधारा 'या कवितेत कवी म्हणतात,

"ऊन पाऊस खेळ हा चाले

सप्तरंगाचे इंद्रधनु दिसले

अमराईच्या वनीं स्वागता

निळे निळे मोरपंख पसरले."

'सांग तू पावसाला ' या कवितेत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होते, पिकांची नासाडी होते. म्हणून कवी कवितेत कवी म्हणतात,

"अरे सांग त्या पावसाला,

नको छळू आता शेतक-याला

काबाडकष्ट करत तो दमला

हरबरा काढत तोच अंबला."


कविमन धार्मिक आहे. आषाढी वारी , वैष्णवांचा मेळा, पंढरीची वारी, जत्रा ओतूरची या धार्मिक आशयाच्या कविता आहेत. 'जत्रा ओतूरची' या कवितेत श्रावण महिन्यात येणा-या सोमवारच्या जत्रेचे वर्णन कविने प्रस्तुत कवितेत केले आहे. वारकरी आषाढी वारीची चातकासारखी वाट पाहतात. विठूरायाच्या भेटीची ओढ त्यांच्या मनाला लागलेली असते. "भेटी लागे जीवा लागलिसे आस! पाहे रात्रंदिवस वाट तुझी!! "कवी आषाढी वारी या कवितेत म्हणतात,

"म्हणे माउली माउली

मिठी उरी वैष्णवांची

माथा टेकती चरणी

भेट विठू रूक्मिणीची."


वैष्णवांच्या मेळा ऊन पावसाची पर्वा न करता 'पाऊले चालती पंढरीची वाट.' यांचे वर्णन करताना कवी म्हणतात,

"चंद्रभागा येई पूर

जमे वैष्णवांचा मेळा

पंढरीस गोतावळा

पाही विठ्ठल सावळा."


पंढरीची वारी जेष्ठ आषाढ महिन्यात येते. जेष्ठ महिन्याची घाई पेरणीची, वारी आषाढीची,पायी दिंडी!!

संत तुकाराम महाराजां म्हणतात, "पंढरीची वारी, आहे माझे घरीं!

आणिक न करी तीर्थव्रत!!

व्रत एकादशी करीन उपवासी!

गाईन अहर्निशी मुखी नाम!!


त्याच त्याच आशयाच्या कविता पुन्हा पुन्हा आल्याने पुनरूक्ती झालेली दिसते. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.


'रिमझिम धारा' या काव्य संग्रहामध्ये सणांवरील कवितांचाही समावेश आहे.

नागपंचमी, रंगपंचमी, रामनवमी, गुढी पाडवा, आली दिवाळी, रक्षाबंधन, गणेशोत्सव इ. सणांची सुंदर माहिती डॉ. डुंबरे यांनी दिली आहे. गणेशोत्सव या कवितेत गणपतीची ओळख करून देताना कवी म्हणतात,

"चौदा विद्या चौसष्ट

कलांचा गणपती

शुभ कार्याचा आरंभ

गणेश पूजनाने करती."


महिला दिन, लाडाची लेक, सावित्रीच्या लेकी, माहेर, स्त्रीची बहुरूपे इ. कवितांमध्यें कविने आपल्या भावना व्यक्त करून महिलांचा गौरव केला आहे. महिला दिन या कवितेत कवी म्हणतात,

"उच्च शिक्षण घेई

होऊन युवा हरीणी

उध्दार कराया

माहेर,सासर प्रकाशुनी."


स्री सासर माहेरचा उध्दार करते. सावित्रीच्या लेकींनी प्रत्येक क्षेत्रांत उंच भरारी घेतली आहे. स्री पुरुष समानता हाही विचार मांडला आहे. माहेर या कवितेत माहेरचे वर्णन करताना कविने म्हटले आहे,

"रानावनातून जाते

वाट माझ्या गं माहेरा

येते भंडारा द-याने

नदी वाहत प्रवरा."


कौटुंबिक, व्यक्तिचित्रणात्मक कवितांनाही आपल्या काव्यसंग्रहात डॉ. डुंबरे यांनी स्पर्श केला आहे. 'देवाघरी गेली आई' ही अतिशय हृदयस्पर्शी कविता आहे.

"फोटोकडे आता सुध्दा

वळून वळून पाही

मायेच्याच आठवणी

आई पुन्हा पुन्हा येई."


'बाप माझा 'या कवितेत कवीने बापाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. बाप...माझा

आहे जगात भारी, करतो आम्हावर , माया खूप सारी."


शेतकरी या कवितेत शेतकऱ्यांचा व्यथा आणि वेदना मांडल्या आहेत. ज्या युगपुरूषाने स्वराज्याचं देखणं स्वप्न प्रत्यक्षात उतरविले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर 'राजे शिवाजी..' अतिशय सुंदर कविता लिहिली आहे.

"जन्म शिवनेरीवर

माता जिजाऊंच्या पोटी

नाव ठेवूनी शिवाजी

दिले स्वराज्याच्या ओटी."


पहिले नमन ज्योतिषाला ज्यांनी स्री मुक्तीला जन्म दिला. स्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन १८४८ साली पुण्यामध्ये भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. ज्योतिबा फुले या कवितेत कवी म्हणतात,

"भिडे वाड्यात मुलींची

पहिली शाळा काढली

शेणगारा मारा सोसून

सावित्री नाही रडली."

जवाना विषयी कवी म्हणतात,

ज्यांना पाहताच

"येते आम्हास स्फूर्ती

देशाची मान उंचावताच

पसरे जगभर किर्ती."


म्हणूनच जवानांबद्दल म्हणावेसे वाटते, "दिव्यत्वाची जेथ प्रचीती! तेथे कर माझे जुळती!!

काटेरी गुलाब, वाटेवर, सुंदर ती, रंग प्रेमाचे, मैत्री, झुंजूमुंजू, कलीयुग, मराठी भाषा गौरव दिन, महाराष्ट्र माझा, मोगरा फुलला, सूर्यनारायण, मतदान करा, जीवनाची संक्रांत, सुगंध प्रितीचा, कलीयुग, सूर्यास्त, म्हातारपणी काठी, मायदेशी परतूनी, साहित्याचा अभंग या सर्व कविता मार्गदर्शक आणि आशयघन आहेत.


'रिमझिम धारा' हा डॉ.प्रविण डुंबरे यांचा कवितासंग्रह अप्रकट मनातील भाव भावनांचा प्रकट रूपातील मूर्त आविष्कार आहे. आशयाचे सामर्थ्य, अविष्काराचे सौंदर्य हे या कवितासंग्रहाचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. त्यांच्या कविता ओढूनताणून तयार केलेल्या नाहीत. तर त्या सहजस्फूर्त स्फुरल्या आहेत. इंग्रजी काव्यातील निसर्ग कवी विल्यम वर्ल्डसवर्थच्या काव्याच्या व्याख्येची आठवण झाली.


Poetry as the spontaneous overflow of

Powerful feelings recollected in tranquillity.


कविने विविध विषयांची आपल्या काव्यसंग्रहात मांडणी केली आहे. एकंदरीत 'रिमझिम धारा' हा काव्यसंग्रह सर्वांगसुंदर झाला आहे. साहित्याच्या व्यासंगामुळे व आवडीमुळे त्यांची काव्यदृष्टी अधिक व्यापक होऊ शकेल. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून यापेक्षा अधिक समृद्ध व सकस साहित्य निर्मिती त्यांच्या कडून होत राहील. कवीच्या काव्यप्रतिभेला साहित्य उन्मेषाचे अनेक धुमारे फुटत जावोत, ही सदिच्छा! यापुढील साहित्य लेखनास माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा!!


प्रा. मधुकर एरंडे (साहित्यिक)

माजी प्राचार्य, महाविद्यालय आळे, तालुका- जुन्नर, पुणे.

दूरध्वनी - ९७६४६०३८९०

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2025 Neel Writes | All Rights Reserved

bottom of page