'रिमझिम धारा' (काव्यसंग्रह) प्रस्तावना:१- श्री. उत्तम सदाकाळ, साहित्यिक मढ, जुन्नर(पुणे)
- Neel Writes
- Aug 19, 2024
- 3 min read
“ओतूर” म्हणजे साहित्यिकांची पंढरी. ओतूरच्या या पावन मातीत अनेक थोर साहित्यिकांची इवली इवली पावले बागडली आहेत. इथूनच त्यांच्या साहित्याचा वटवृक्ष अवघ्या दिगंतात बहरला आहे. प्रसिद्ध साहित्यिक शंकर वैद्य, अनिल अवचट , सुभाष अवचट, मनोहर घोलप, सदा डुंबरे अशा गौरवशाली साहित्यिकांची परंपरा या मातीने आपल्या अंगाखांद्यावर खेळवली आहे. आणि सध्याच्या घडीला या मातीने एक हळव्या मनाचा सर्जनशील कवी साहित्य क्षेत्राला दिला आहे. आणि ते नव्या दमाचे कवी म्हणजे “डॉ.प्रविण डुंबरे”.

खरं तर वैद्यकक्षेत्र आणि साहित्य हा सबंध तसा लवकर न जुळणारा. पण मानवी शरीराची काळजी घेत घेत मानवी मनाच्या भावभावना कागदावर उतरविण्याची कमालीची कुशलता हसतमुख कवी डॉ.प्रविण डुंबरे यांच्याकडे असल्याने त्यांनी हा अलभ्य लाभ जुळविला आहे. आपला पेशा सांभाळत कवितेच्या नभांगणात विहरणे तसे जिकरीचे काम पण डॉ.प्रविण डुंबरे यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे.
डॉ.प्रविण डुंबरे यांचा ‘मोरपंखी’ नावाचा एक सुंदर कवितासंग्रह या अगोदर प्रसिद्ध झाला आहे. त्याचे वाचकांनी अभूतपूर्व असे स्वागत केले होते. डॉ.प्रविण डुंबरे हे अनेक वृत्तपत्रातून व मासिकांमधून सातत्याने कविता लेखन व स्तंभ लेखन करत आहेत. शब्दांची जवळीक साधून त्यांचे अर्थपूर्ण अलंकार रसिकांच्या समोर प्रस्तुत करताना या कवीला मनस्वी आनंद होत असतो. त्यांच्या या साहित्य सेवेचे समाजाने सुद्धा छान कौतुक केले आहे. त्यांना मिळालेले अनेक पुरस्कार याची साक्ष देत आहेत.
चैतन्य महाराजांच्या पावनभूमीतून अंकुरलेला हा कवी सच्च्या दिलाचा आणि निर्मळ मनाचा माणूस आहे. साहित्य वर्तुळात चैतन्याचा खळाळता झरा म्हणजे कवी डॉ.प्रविण डुंबरे असे सूत्र ठरले आहे. आपल्या पहिल्याच काव्यसंग्रहाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कवी डॉ.प्रविण डुंबरे आता आपला “ रिमझिम धारा” हा दुसरा काव्यसंग्रह घेऊन रसिकांच्या भेटीला आलेले आहेत. त्यांच्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे नावच रिमझिम धारा असल्याने कवितेच्या या रिमझिम धारा वाचकांच्या मनाला चिंब चिंब करतील याची मला खात्री आहे.
“रिमझिम धारा” या काव्यसंग्रहातील कविता वाचून रसिक पाऊस अनुभवतील...निसर्ग अनुभवतील...चिंब होण्याची गंमत अनुभवतील. आपल्या या पावसाच्या अनुभूतीच्या काव्यसंग्रहात त्यांनी एकूण ८४ कवितांचा नजराणा रसिकांसाठी पेश केलेला आहे. लेण्याद्री प्रकाशनाने दर्जेदार पुस्तक निर्मिती करून डॉ.प्रविण डुंबरे यांच्या शब्दांना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे.
या कवितासंग्रहात सर्वच विषयावरील अर्थगर्भ कवितांचा समावेश आहे. मात्र पावसाला झुकते माप मिळाल्याने हा काव्यसंग्रह झिम्माड पावसाचा ओला स्पर्श असलेला झाला आहे हे नक्की. कवी आपल्या “रात्रीची तू रातराणी”पहिल्याच कवितेत म्हणतात,
गंध मंद हळूच पसरून
मनास माझ्या भुलवू नको
हे सांगत असताना कवी डॉ.प्रविण डुंबरे कवितेच्या अर्थांची बरसात वाचकांच्या हाती सोपवून सुगंधाची पखरण करतात.
पाऊस हा सर्वच कवींचा आवडता ऋतू. त्यामुळे डॉक्टरी पेशातील गंभीर वातावरणातून मोकळीक देणारा हा मनभावन पाऊस कवी डॉ.प्रविण डुंबरे यांना आवडला नसता तर नवलच !!! आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या कविता संग्रहाचे नाव सुद्धा “रिमझिम धारा” ठेवलेले आहे.
आपल्या “पाऊसधारा” या कवितेत पावसाच्या आगमनाचे सुरेख वर्णन करताना कवी म्हणतात,
भेगाळल्या जमिनीला
भिजवून गेल्या धारा
घामेजल्या शरीराला
शहारून गेला वारा
पावसाच्या आगमनाची आतुरता जशी निसर्गाला आहे.तशीच ती कविमनालाही आहे हे वरील ओळीतून लक्षात येते.
पियू पियू आवाजात
चातकही ओरडला
मेघ सावळे बघून
शेतकरी आनंदला
”आला पावसाळा” या कवितेतून ऋतुच्या आगमनाने आनंदलेल्या सृष्टीचे मनोहरी वर्णन कवी डॉ.प्रविण डुंबरे करतात.
काव्यसंग्रहाच्या शीर्षक कवितेत तर कवी पावसाची नानाविध रूपे आपल्याला अनुभवायला देतात. त्यांच्या सहज सुंदर आणि साध्या सोप्या शब्दरचनेतून वाचकांच्या मनावर ही कविता गारुड करते. ते कवितेतील पुढील ओळीत म्हणतात,
अधीरल्या नयनात
मेघ आता दाटलेले
अंधारल्या आसमंती
थेंब थेंब बरसले
वरील काव्यपंक्तीतून ते एकाच वेळी पाऊस आणि अधीर मनाची व्याकुळ स्थिती आपल्या शब्द सामर्थ्याने वाचकांच्या मनात नकळतपणे बिंबवून जातात.
“श्रावणधारा” कवितेतील त्यांचा पाऊस “क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे” या बालकवींच्या काव्यपंक्तींची आपल्याला साक्ष देऊन जातो.
निसर्गातील पावसाची शब्दश्रीमंत वर्णने करता करता कवी स्वतःच्या कोमल नाजूक भावनांना या “पावसाने भिजायचे” या कवितेतून वाट करून देतो.
पहिल्या पावसाने
थोडे थोडे भिजायचे
मला माझ्या मनातले
कानी तुझ्या सांगायचे
असे लिहिताना कवी डॉ.प्रविण डुंबरे त्यांच्या मनाचे गुज हळुवारपणे आपल्या कवितेतील शब्दांच्या हाती सोपवतात.व रसिकांना त्यांच्या मनातील गोड गुपिताची हळुवार आठवण करून देतात.
डॉ.प्रविण डुंबरे यांनी आपल्या सभोवतालचा निसर्ग अनुभवला असल्याने त्यांच्या कवितेत हा निसर्ग आपसूक आला आहे. ओतूर परिसर तसा पावसाचा परीसर असल्याने पावसाच्या रिमझिम धारा त्यांना भावल्या असाव्यात आणि म्हणूनच त्यांनी वाचकांसाठी या रिमझिम धारा काव्यसंग्रहाच्या जलदांमधून आणल्या असाव्यात.
हा कवितासंग्रह वाचकांना नक्कीच आवडेल यात तिळमात्र शंका नाही. आपण या रिमझिम धारांचे स्वागत करून हा काव्यऋतू सर्वांपर्यंत पोहोचवूयात.
अशी अनुभवसंपन्न काव्यानुभूती अनुभवायला दिल्याबद्दल डॉ.प्रविण डुंबरे यांचे मनपूर्वक धन्यवाद ! त्यांच्या पुढील लेखन प्रवासास माझ्या खूप खूप शुभेच्छा !
उत्तम सदाकाळ
A-3, सप्तशृंगी सदन, सूर्योदय रेसिडेंसी,
रविवार पेठ,
शिवजन्मभूमी जुन्नर-४१०५०२
मोबा. ९०११०१६६५५
Comments