top of page

'प्रतिबिंब..' (ललित लेख संग्रह)प्रस्तावना... प्रा. डॉ. जयसिंग गाडेकर

छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील ओतूर या गावी गेली ३४ वर्षे वैद्यकीय व्यवसायामध्ये राहिल्यामुळे रुग्णांच्या शारीरिक व्याधींचा अभ्यास करता करता मनोव्यापारांचा देखील उत्तम अभ्यास असणारे डॉ. प्रविण डुंबरे यांचा‘प्रतिबिंब’ हा पहिला ललितलेख संग्रह आहे. जरी हा पहिलाच ललितलेख संग्रह असला तरी तो त्यातील विषयांचे वैविध्य व आशयवस्तूचा विचार करता पहिला वाटत नाही हे सुरुवातीलाच नमूद करायला हवे.



कोरोनाच्या महामारीच्या काळात डॉ. प्रविण डुंबरे यांना आपल्यातील सर्जनशील कवी व लेखकाची ओळख झाली असे त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून लक्षात आले. बालवयातच त्यांच्यावर सानेगुरुजींच्या विचारांचा प्रभाव पडल्यामुळे त्यांच्यावर श्यामच्या आईचे नकळत संस्कार झाले. हे चांगुलपणाचे संस्कार व त्याविषयीची त्यांची तळमळ त्यांच्या लेखांमधून स्पष्टपणे दिसून येते. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी चारोळ्या व कवितालेखनास सुरुवात केली आणि २७ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांचा मोरपंखी या नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला.


या कवितासंग्रहाच्या प्रकाशनानंतर त्यांनी समाज माध्यमांवर स्फुटलेखनाच्या माध्यमातून आपले अनुभव मांडायला सुरुवात केली. प्रामुख्याने व्यसनमुक्ती, डी. जे. चा अतिवापर आणि तंबाखूच्या दुष्परिणाम या व इतरही विषयांवरील त्यांचे हे लेखन त्यांच्या मित्र मंडळींना खूप आवडले.



त्यातील काही मित्रांनी आपण लिहिलेले लेख हे ललित लेखांच्या अंगाने जाणारे लेख आहेत त्यामुळे तुम्ही ललित लेखनाकडे वळावे असा सल्ला दिला. त्यातून आपल्या रिकाम्या वेळेत आलेल्या अनुभवांचे चिंतन करीत असता त्यांच्याकडून अनेक लेख लिहिले गेले. त्यातील निवडक एक्कावन्न लेखांचा समावेश असलेल्या प्रतिबिंब या ललित लेखसंग्रहाच्या माध्यमातून डॉ. डुंबरे वाचकांच्या भेटीला येत आहेत.



ललित साहित्य हे लेखकाच्या प्रतिभेतून आणि कल्पनाशक्तीतून निर्माण होते. जरी ललित लेखनाला वास्तवातील व्यक्ती घटना प्रसंग यांचा पायाभूत आधार असला तरी त्यातून निर्माण होणारे अनुभवविश्व हे लेखकाची कल्पक अशी निर्मिती असते. ललित लेखन हे प्रामुख्याने व्यक्ति केंद्रित आणि भावना केंद्रित असते व ते सौंदर्य सिद्धीच्या तत्त्वानुसार आकार घेत असते. लघु निबंध, नाट्यछटा कथा, कविता, प्रवासवर्णन, नाटक,कादंबरी हे ललित लेखनाचे प्रकार आहेत.


ललित साहित्याचा विचार करता जे लीलेतून म्हणजे स्वानंदासाठी केलेल्या क्रिडेतून तयार होते ते ललित साहित्य होय. जी साहित्यनिर्मिती आपल्या स्वयंपूर्ण अस्तित्वाने व्यक्तीला सौंदर्याचा साक्षात्कार घडविते, त्याला व्यवहार निरपेक्ष आनंद देते, वाचकाची स्वतःविषयी आणि या जगाविषयीची समज विशाल व्यापक आणि उन्नत करते त्या साहित्याला ललित साहित्य असे म्हणता येईल.


मराठी भाषेला ललित लेखनाची मोठी परंपरा आहे.ललित लेखनाच्या स्वरूपाचा विचार करता आपणाला महानुभावीय व बखर वाङ्मयापर्यंत मागे जावे लागते. महानुभावीय गद्य वाङ्मयात व्यक्तिचित्रण, समाजदर्शन, अध्यात्मचिंतन, तत्त्व चर्चा, विनोदात्मकता अशा अनेक रूपांमध्ये ललितगद्य दिसून येते. बखर वाङ्मयात व्यक्तिचित्रण, लढाया व विविध प्रसंग यांची सहज सोप्या पण विविध रसांनी युक्त असणाऱ्या ओघवत्या भाषेत वाचकाला मांडणी केलेली दिसून येते.


साधारण १९२५ च्या सुमारास लघु निबंध लिहिण्यास सुरुवात झाली. वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके यांनी लघु निबंध हा प्रकार इंग्रजी साहित्यातून मराठी साहित्यात आणला असे मानले जाते. विचारनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ या अंगाने लघु निबंध विकसित होत गेला. जेव्हा त्यात व्यक्तिमत्व आणि व्यक्तीची अनुभव यांना प्राधान्य मिळत गेले व अनुभवांच्या आविष्काराला महत्त्व मिळाले तेव्हा लघुनिबंधांचे रूपांतर ललितगद्यामध्ये अर्थात ललित लेखनामध्ये झाले. ना. सी. फडके व वि. स. खांडेकर, यांच्यापाठोपाठ अनंत काणेकर, कुसुमावती देशपांडे, श्री. वि. कुलकर्णी, दुर्गा भागवत, ईरावती कर्वे, शांता शेळके विं. दा. करंदीकर, बा. भ. बोरकर, न. वि. गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, सरोजिनी वैद्य, ग. दि. माडगूळकर, रविंद्र पिंगे, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, माधव आचवल, महेश एलकुंचवार, चंद्रकुमार नलगे, अनंतराव पाटील, अनिल अवचट, द. ता. भोसले, या व अशा अनेक नामवंतांनी मराठी भाषेतील ललित लेखनाचे दालन समृद्ध केले आहे.


त्यात दिवसेंदिवस नवनवीन ललित लेखकांची भर पडत आहे.


ललित साहित्याच्या स्वरूपाविषयी अनेक मान्यवरांनी आपापली मते मांडली आहेत. त्यामुळे ललित लेखनाची एकच एक व्याख्या करता येणे अतिशय अवघड आहे. भीमराव कुलकर्णी यांच्या मते कथा, कादंबरी, नाटक, चरित्रे- आत्मचरित्रे व कविता इत्यादी वाङ्मयात प्रकारात न बसणाऱ्या वांग्मयाचा ललित वाङ्मयात समावेश करण्यात येतो. आनंद यादव यांच्या मते प्रमुख गद्य प्रकारांव्यतिरिक्त जे लेखन ते ललित गद्य अथवा ललित लेखन होय. थोडक्यात सांगायचे तर ज्या लेखनात लेखकाने आपल्याला आलेले विविधांगी जीवनानुभव आपल्या प्रतिभेचा वापर करून लालित्यपूर्ण भाषेत केलेले असते अशा सर्जनशील लेखनाला आपण ललित साहित्य म्हणायचे.


ललित लेखन हे लेखकातील 'मी' च्या आविष्काराचे केंद्र मानून लेखकाने आपल्या अनुभवांना कल्पकतेने शब्दांकित केले तर त्यातून निर्माण झालेले साहित्य लेखक व वाचक या दोघांनाही आनंदाची प्राप्ती करून देते. प्रतिबिंब या ललित संग्रहातील बहुतांश लेख या अपेक्षांची पूर्ती करतात असे म्हणायला हरकत नाही.


प्रतिबिंब या ललित लेख संग्रहाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकता लक्षात येते की डॉ. डुंबरे यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. ना. सी. फडके यांच्या शब्दात सांगायचे तर जी वस्तू लोकांचे सामान्य दृष्टीला उपेक्षणीय वाटत असते तिच्याविषयीच बोलायला लागून तिचे सौंदर्य वाचकांना पटवून देण्याचे काम लघु निबंधात करावयाचे असते. ना. सी. फडके यांच्या या मताचा विचार करता प्रतिबिंब या ललित लेख संग्रहातील विषयांकडे पाहता लेखकाने उपेक्षणीय विषयांना लक्षणीय करण्यात यश मिळवले आहे असे म्हणायला हरकत नाही.


पर्यावरण सखा’ या लेखातून लेखकाने मानवाने अधिकाधिक पर्यावरण स्नेही होण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. ‘पाणी’ लेखात मानवासाठी पाण्याचे महत्व अधोरेखित करतानाच माणसाने दुष्काळ, महापूर, जागतिक तापमान वाढ अशा विविध आपत्तींच्या पाठीमागे बेसुमार जंगलतोड हे कारण असल्याचे नमूद केले आहे.


‘श्वास’ या लेखात मानवासाठी शुद्ध हवेचे महत्व सांगतानाच हवेचे प्रदूषण रोखण्याची गरज व्यक्त केली आहे. याबरोबरच वैयक्तिक आरोग्यासाठी धुम्रपाण्यासारखे व्यसनांपासून दूर राहायला हवे हे आग्रहपूर्वक लिहिले आहे. सुगंध ह्या ललित लेखात विविध प्रकारचे सुगंध आणि फुलांविषयी माहिती देण्यात आली आहे. या लेखात संत ज्ञानेश्वरांच्या


अवचिता परीमळू झुळूकला अळूमाळू

मी म्हणे गोपाळु आला गे माये


या विराणीचा सुंदर संदर्भ दिला आहे. ‘संस्कार शाळा’ या लेखातून लेखकाने लहान मुलांमध्ये संस्कार रुजवण्याची गरज व्यक्त करतानाच हे संस्कार जेवढे आई-वडील आणि शिक्षकांकडून मिळतात तेवढेच निसर्गाकडून देखील मिळत असतात ही महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.


किशोरावस्था’ या लेखातून लेखकाने किशोरावस्थेतील मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर भाष्य करताना त्यांच्या मन, बुद्धी,भावना, प्रेम, मैत्री यांच्या संदर्भातील भावनिक विकासाबाबत देखील उत्तम प्रकारे चर्चा केली आहे.‘संगत’ या लेखांमध्ये लेखकाने चांगल्या मित्रांचे संगतीमुळे होणारे फायदे आणि चुकीच्या संगतीमुळे झालेले नुकसान याबाबत सुंदर विचार मांडले आहेत. अर्जुनापेक्षा अनेक बाबतीत सरस असणाऱ्या कर्ण केवळ दुर्योधनाची संगत केल्यामुळे खलनायक ठरला आणि उध्वस्त झाला हे कुसंगतीचे सर्वकालिक उदाहरण दिले आहे.


‘अपेक्षा’ या लेखामध्ये एखाद्या माणसाविषयी त्याचे कुटुंबीय मित्र आणि समाज यांच्याकडून केल्या गेलेल्या अवास्तव अपेक्षा त्याच्या दुःखात कशा कारणीभूत ठरतात याचे सुंदर विवेचन केले आहे. ‘मानव’ एक सुंदर कलाकृती या लेखात लेखकाने निसर्गाने मानवाला दिलेल्या बुद्धी, सृजन या गुणांबरोबरच दया, क्षमा, शांती, सौजन्य, परोपकार असे सद्गुणही दिले आहेत आणि या सर्व सद्गुणांचे योग्य प्रकारे संवर्धन होण्याची गरज व्यक्त केली आहे.


‘कुंभार’ या ललित लेखामध्ये कुंभाराच्या मडकी घडवण्याच्या कामापासून तो अहोरात्र करीत असलेल्या घामापर्यंत वर्णन केलेले आढळते. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा जसा आकार द्यावा तसा आकार येतो या उक्तीचा अतिशय समर्पक उपयोग या लेखात करण्यात आला असून मुलांना घडवण्यामध्ये पालकांची जबाबदारी मोठी आहे याकडे लक्ष वेधले आहे.


‘आदर’ या लेखामध्ये आजकाल समाजामध्ये थोरामोठ्यांचे विषयी असलेला आदर कशाप्रकारे कमी होत आहे याविषयी अतिशय सुंदर विवेचन केले गेले आहे.’स्त्रीचे देवी स्वरूप’ हा असाच या लेखसंग्रहातील स्त्री विषयक जाणीवा समृद्ध करणारा अतिशय सुंदर लेख आहे. बालिका, कुमारी, युवती, नववधू, गृहलक्ष्मी आशा विविध टप्प्यांतून जात असताना सामाजिक आणि धार्मिक रितीरिवाज सांभाळताना तिची होणारी कुचंबना या लेखात लेखकाने अतिशय प्रभावी आणि नेमक्या भाषेत मांडली आहे.


या संग्रहातील स्त्री,स्वातंत्र्य, पाहुणे, विश्वास,घाव, जरा विसाऊ या वळणावर, पत्र तार आणि डालड्याचा डबा, निवृत्ती, पिकलं पान आणि प्रतिबिंब हे लेख अत्यंत वाचनीय आहेत आणि लेखकाच्या लेखनप्रतिभेची नेमकी ओळख करून देणारे आहेत.


‘पदर’ या ललित लेखात लेखकाने या पदराची विविधरंगी रूपे अतिशय सुंदर शब्दात मांडली आहेत. पदर येणे पदर घेणे पदर सांभाळणे या गोष्टी सांभाळता सांभाळता

डोईचा पदर आला खांद्यावरी

भरल्या बाजारी जाईल मी

या संत जनाबाईंच्या अभंगाचा अतिशय समर्पक उल्लेख या लेखात येतो.

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा

आई मला नेसव शालू नवा

या गीताची आठवण करून देता देता बालभारतीच्या पुस्तकातील कृ. ब. निकुंब यांच्या माहेरवाशीनीचा ‘घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात’ या कवितेने या लेखाची सांगता होते.

यामध्ये फिरून फिरून सय येते जीव वेडावतो

चंद्रकलेचा गं शेव ओलाचिंब होतो


या ओळींनी या लेखाला अतिशय उंचीवर नेले आहे.

माझ्या मते या ललित लेख संग्रहातील हा सर्वात उत्कृष्ट लेख आहे.


ललित लेख आणि इतर वैचारिक लेख यांच्यामध्ये एक फरक असतो तो हा की वैचारिक लेख हे गद्यात असतात तर ललित लेख हे गद्य आणि पद्य यांचे सीमेवर असतात. उत्तम ललितलेखन करण्यासाठी लेखकाजवळ उपजत असलेल्या प्रतिभेला वाचन आणि त्याद्वारे प्राप्त झालेल्या व्यासंग तसेच चिंतनाची जोड आवश्यक आहे. या ललित लेख संग्रहातील लेखांचा एकूणच विचार करता लेखकाने आपल्या प्रतिभेला आणि कल्पकतेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न केला आहे असे जाणवते.


या ललित लेख संग्रहात लेखकाने वैचारिकतेकडे अधिक लक्ष दिले आहे व लालित्याच्या बाजूकडे तितकेसे लक्ष दिले नाही असे जाणवते. ललित लेखनामध्ये शाब्दिक आणि भावात्मक सौंदर्यामुळे एक प्रकारची काव्यात्मकता शब्दाशब्दांतून दिसायला हवी आणि ते अपेक्षितही असते. यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कोणतेही साहित्य निर्माण करताना त्यातून मिळणाऱ्या आनंदाच्या पलीकडे जाऊन त्यामागील विचार आणि उद्देश हा तितकाच महत्त्वाचा असतो ही गोष्ट महत्त्वाची असते. या लेखांमध्ये बरेचसे लेख समाजातील अनिष्ट, रूढी चाली व परंपरा यातून निर्माण झालेले प्रश्न उपस्थित करतातच पण या सामाजिक प्रश्नांचे समाधान करण्यासाठी मार्गदर्शनदेखील करतात. ललित लेखनात लेखकातील ‘मी’ महत्वाचा असतो.


आपल्या अवतीभवती घडणाऱ्या विविध घटना व प्रसंग यांचे मुक्त चिंतन व त्यातून सहजपणे होणारा आत्माविष्कार त्यांच्या प्रत्येक लेखातून ठळकपणे समोर येतात. माझ्या मते हेच डो.प्रवीण डुंबरे यांच्या लेखनाचे बलस्थान आहे.

लेखक वैद्यकीय पेशात असल्यामुळे पुरेसा वेळ उपलब्ध नसतानादेखील डॉ. प्रविण डुंबरे यांनी वाचन आणि लेखनाची आवड जोपासत ललितलेखनामध्ये जे पाऊल टाकले आहे ते नक्कीच आश्वासक आहे. त्यांच्याविषयी अपेक्षा वाध्द्विणारे आहे.


त्यांच्याकडून असलेल्या या अपेक्षांची पूर्ती पुढील लेखनाद्वारे नक्कीच होईल याबद्दल मला खात्री आहे. प्रतिबिंब या ललितलेख संग्रहाचे वाचक व जाणकार रसिक नक्कीच स्वागत करतील याची मला खात्री आहे. त्यांच्या प्रतिबिंब या ललितलेख संग्रहाला हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांच्याकडून उत्तमोत्तम साहित्य निर्मिती व्हावी यासाठी मनस्वी शुभेच्छा.


प्रा. डॉ. जयसिंग गाडेकर,

(कवी व गझलकार)

रसायनशास्त्र विभाग प्रमुख, बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे, ता. जुन्नर, पुणे

दूरध्वनी- ९९७०३४१६४६

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2025 Neel Writes | All Rights Reserved

bottom of page