पुस्तक परिचय...ममता पहिलवान...जुन्या काळातील वादळ: डॉ. प्रविण डुंबरे
- Neel Writes
- Aug 23, 2024
- 3 min read
देशातील पहिली महिला कुस्तीपटू ममता अथवा ममत्या पहिलवान, हे मित्रवर्य लेखक श्री. रणजीत पवार यांनी मला दिलेले पुस्तक हाती घेताच, अगदी दोन दिवसात अधाशासारखे वाचले. ममताईंच्या घराण्याचे आद्य पुरुष हैबतराव हे सिन्नर जवळच्या पाटोळे परिसरात कसे आले, आणि त्यांनी आपले, जनावरांचे आणि घरादाराचे बस्तान कसे बसवले याची खूप सुरेख माहिती रणजीत पवार यांनी दिली आहे. आजच्या आधुनिकतेच्या युगात फक्त चूल आणि मूल किंवा फक्त शिक्षण आणि नोकरी यातच गुरफटणाऱ्या स्त्रिया आपण पाहतो.
परंतु साधारणतः १०० एक वर्षांपूर्वीचा काळ खूप जुन्या रीतीरीवाजाने व रूढी परंपरेने जखडलेला होता. त्या काळात आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे, मोठा मुलगा दादा याला कोल्हापुर येथे पहिलवानकीचे प्रशिक्षण घेण्यासाठी, आणि ममता यांना त्याच्या बरोबरीने आणि स्वतः कुस्तीचे सर्वोत्तम प्रकारचे धडे देऊन घडवणे, म्हणजे खरोखर दिव्य आहे. मुलीला मुलासारखेच वागवणे आणि सन्मान देणे हेच सध्याच्या काळात सुद्धा कित्येक जणांना समजत, उमजत आणि जमत सुद्धा नाही, तिथे ममताईच्या वडिलांनी म्हणजे खंडोजींनी दूरदृष्टी आणि खूप मोठे स्वप्न डोळ्यापुढे ठेवून केलेले, आणि समाजासाठी आदर्शवत ठरेल असे खूप मोठे काम आहे.
पुरुषांसंगे निर्वस्त्र होऊन खेळली कुस्ती
नाही बाळगली लाज तू
म्हणून आमच्या हृदयामध्ये
बसली आहे आज तू
लेखक श्री. रणजीत पवार यांनी 'ममता पहिलवान' या पुस्तकामध्ये प्रसंगानुरूप आणि व्यक्तिनिष्ठ खूप सुंदर अशा अनेक प्रकारच्या चारोळ्या लिहिल्या आहेत. तसेच संपूर्ण पुस्तकामध्ये..आत्ताच्या पालकांनी मुलांवर कसे संस्कार करावेत आणि त्यांना कसे घडवावे, याविषयी सुद्धा मोठ्या प्रमाणात संस्कार धडे लिहिले आहेत. वडील खंडोजींनी ममताला ती मुलगी असली तरी.. सुद्धा तो आपला मुलगाच आहे, अशा पद्धतीने वागवले आणि वाढवले.
त्याकाळी शिक्षणाच्या वाटा जास्त कोणाला माहित नसल्या तरीही... मनातल्या आवडत्या कलेवर किती प्रेम करावे, आणि ती कला साध्य करण्यासाठी जीवनामध्ये येतील तेवढे कष्ट निभवावे लागतात. ममता जीवनभर कुस्ती जगली आणि तिने वडिलांच्या छत्रछायेखाली परिसरात अजिंक्य पहिलवान असे नाव कमावले.
हे सारे केवळ आणि केवळ वडील खंडूजी यांच्या प्रेरणेनेच शक्य झाले. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुला मुलींना काय शिकवावे, किती शिकवावे आणि कुठे किती आणि कसे प्रोत्साहन द्यावे याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे तिचे वडील खंडूजी होय. 'पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रिया..' असे उद्गार आपण नेहमी ऐकतो परंतु 'पुरुषांसंगे निर्वस्त्र होऊन खेळली कुस्ती...' पुरुषांसारखा व्यायाम करून, छातीला विटांनी बडवून आणि खंडोबाकडे आलेली पाळी जाण्यासाठी साकडे घालने... आणि फक्त एवढ्यावरच न थांबता पाळी जर आली तर, विटाळात मंदिराच्या कळसावर चढून निषेध करण्याची तयारी तिने दाखवली होती. एक स्त्री असून अखंड ब्रह्मचर्य व्रत स्वीकारत आणि त्याचा अंगीकार करत, पुरुषांच्या मनीच्या भावना तिने आयुष्यभर जोपासल्या आणि त्यात तिच्या सुदैवाने निसर्गानेही तिला भरभरून साथ दिली.
तू कोण आहे,
कळले नाही कुणा कुणाला
कुस्तीमध्ये चित्रपट केले,
तू भल्याभल्यांना
परिसरातील जत्रायात्रांमध्ये भरणाऱ्या कुस्त्यांच्या आखाड्यांमधे ती जात राहिली, आणि भल्याभल्या पहिलवानांना तिने मातीच्या आखाड्यात चितपट करून कायमस्वरूपी अजिंक्यपद मिळवले. तिच्या कुस्ती प्रेमामुळे आणि कुस्तीतील अखंड यशामुळे झालेल्या वादातून, वडील खंडूजी आणि सख्खा मोठा भाऊ दादा यांच्या मधे वाद होऊन, सरकारने दिलेल्या लायसनधारी बंदुकीतून गोळी सुटून खंडोजींकडून स्वतःच्या मुलाचा खून झाला..आणि त्यांना पंधरा वर्षाची शिक्षा झाली. या पंधरा वर्षाच्या काळात ममताने सरकारच्या वतीने मिळालेली ५०० एकर जमीन आणि गुरेढोरे मोठ्या हिकमतीने सांभाळली.
या काळात तिने तिच्या आवडत्या पहिलवानकीला आणि कुस्त्यांना काही काळ विश्रांती दिली. वडिलांच्या सुटकेनंतर त्यांच्याच आशीर्वादाने आणि प्रोत्साहनने.. तिने पुन्हा कुस्त्यांचे आखाडे गाजवले. परंतु एका स्त्री पहिलवानाकडून आपण पराभूत झालो आहोत, या भावनेने तिच्याबरोबर कुस्ती खेळायला...कोणतेही पुरुष पैलवान येत नव्हते. त्यामुळे तिने पहिलवानकीच्या यशस्वी कारकीर्दीला अखेरचा रामराम ठोकला, आणि आपले उर्वरित आयुष्य देवधर्म आणि भजन कीर्तन यांच्यामध्ये शेवटपर्यंत व्यतित केले.
लेखक श्री. रणजीत पवार यांनी ममता पहिलवान यांच्या गावी चार-पाच वेळा जाऊन गोळा केलेली माहिती, ममता यांच्या जीवन कार्याला, जीवन प्रवासाला आणि चरित्र लेखनाला १००% सत्यता आणते. पाटोळे डोंगरावरील खंडोबाच्या मंदिराचे, डोंगराचे फोटो, सिन्नर येथील तालमीचे, ममता यांच्या जुन्या घराचे आणि गोठ्याचे फोटो तसेच ममतांच्या परिचयातील कितीतरी व्यक्तींची मनोगते खूप सुंदर पद्धतीने लिहिली आहेत.
ओघवत्या आणि अप्रतिम दर्जेदार भाषेत लिहिलेले हे पुस्तक वाचताना, अगदी ममताचा संपूर्ण जीवनपट चित्रपटाप्रमाणे आपल्या डोळ्यापुढून अलगद पुढे पुढे सरकत आहे असे वाटते. ममता पैलवान या पुस्तकाची.. 'महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड' या पुस्तकात नोंद झाली आहे. आणि हेच या लेखकाचे व लेखनाचे यश आहे. या पुस्तकाचे हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये लवकरच रूपांतर होत आहे, ही आपणा सर्वांसाठी सुद्धा खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
'देशातील पहिली महिला कुस्तीपटू' अशा नावाने ममता पहिलवानाचा लेखकाने सर्व जगाला परिचय करून दिला आहे. तरी सुद्धा... कुस्ती क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने, फक्त एक लंगोट वापरून, त्यांना आपल्या शक्तीने आणि युक्तीने आखाड्यातील कुस्तीत चितपट करून पाणी पाजणारी ममता ही सर्वच्या सर्व कुस्त्यांमध्ये अपराजित आणि अजिंक्य राहिली आहे. ऑलम्पिकमध्ये कुस्तीचा समावेश प्राचीन काळापासून झाला आहे, पण आधुनिक ऑलम्पिक खेळांमध्ये कुस्तीचा समावेश १८९६ मध्ये करण्यात आला.
त्या काळामध्ये तिने ऑलम्पिक क्रीडा क्षेत्रामध्ये कुस्ती खेळामध्ये भाग घेतला असता तर नक्कीच त्याकाळी भारताला कुस्तीची कितीतरी सुवर्णपदके मिळाली असती... असो, लेखक रणजीत पवार यांच्या लेखणीतून आणि अभ्यासातून आपल्याला ममता पहिलवान यांची जिद्द, प्रेरणा आणि यशस्वी गाथा समजली आणि वाचायला मिळाली हे आपले परमभाग्य आहे.
हुशार, अभ्यासू आणि जिद्दी लेखन यांच्याद्वारे साहित्य क्षेत्रात मोठे नावलौकिक मिळवलेले, रणजीत पवार सर यांची पुस्तक रूपी लिहून गौरवलेली ममता पहिलवान, या कुस्ती क्षेत्रातील जुन्या काळातील महिलेला योग्य प्रकारे न्याय मिळेल आणि त्यांच्यावर लेखकाच्या मनातील, सर्वांना आणि विशेष करून महिलांना प्रेरणा देणारा चित्रपट...पुढच्या काळात लवकरच निघेल यात तीळ मात्र शंका नाही. ममताच्या कार्यकर्तृत्वाला सलाम!
डॉ. प्रविण डुंबरे, ओतूर (पुणे)
९७६६५५०६४३
Comments