top of page

परदेशवारीचा अद्भुत अनुभव : जेटीएम्पीएची थायलंड सहल

जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची (जेटीएमपीए) दीर्घकालीन सहल कुठे न्यायची यावर, ट्रिप कमिटी मेंबर्स व इच्छुक मेंबर्स यांच्यामध्ये बरेच दिवस एकमत होत नव्हते. एक तर बऱ्याच जणांचा अर्धा अधिक भारत यापूर्वीच पाहून झाला होता. आणि भारतात काय! स्वतंत्र, सहकुटुंब केव्हाही जाता येईल. परंतु.. यावर्षीचे ट्रीपचे मुख्य आकर्षण हे परदेश दौराच असावे, असे ट्रीपच्या मीटिंगमध्ये येण्यापूर्वी प्रत्येक जण, डोक्यात ठरवूनच आलेला होता. प्रत्येक झोनमध्ये असतात, असा आमच्या झोन मध्ये सुद्धा दोन-तीन जणांचा तरी, एकाच देशामध्ये अनेक वेळा प्रवास झालेला आहे.



सध्या भारतातील सहलीच्या खर्चामध्ये, परदेशामधली कमी दिवसाची ट्रिप सहज होऊन जाते. आणि ज्यांनी अद्याप पर्यंत परदेश प्रवास केला नाही, त्यांच्यासाठी मात्र ही सुवर्णपर्वणी ठरते. आणि हे सप्रमाण सिद्ध झाल्यानंतर... सर्वांचे मिळून एकदाचे शिक्कामोर्तब झाले, व थायलंड देशात म्हणजे बँकॉक व पटाया या दोन शहरांमध्ये, सहकुटुंब प्रवासासाठी जायचे असे ठरले. जास्त वेळा ज्यांचा परदेश दौरा झालेला आहे, अशा मित्रमंडळींचा सल्ला, मार्गदर्शन यावेळी घेण्याचे ठरले. आणि जेटीएमपीए कमिटी कामाला लागली. पुणे शहरातील दोन-तीन टुरिस्ट संस्थांची कोटेशन मागवली गेली आणि त्यातून...सहा दिवस व पाच रात्र, ६ ते ११ नोव्हेंबर २०२४ अशा सुंदर सहलीचे नियोजन झाले.


चार महिने अगोदर लवकर सुरुवात केली होती...तरी सुद्धा बऱ्याच लोकांचे पासपोर्ट तयार नव्हते, काही जणांचे नूतनीकरण करण्याचे बाकी होते. काहींचे आधार कार्डच अपडेट नव्हते. तर काहींना मुलांच्या जन्म दाखल्यापासून, आधार कार्ड आणि पासपोर्ट पर्यंत तयारी करावी लागली. अशा रीतीने सर्व गोष्टींची पूर्तता करून, लहान मोठे धरून सहकुटुंब ५१ जणांचे नियोजन पूर्ण झाले.


सहलीपूर्वी आठ दिवस गळ्यातील बॅग वाटप होऊन, संपूर्ण प्रवासाचा लेखाजोखा, झेरॉक्स प्रतींच्या स्वरूपात प्रत्येकाच्या हाती देण्यात आला. त्यांचबरोबर प्रवासात बरोबर घ्यायचे पासपोर्ट, आधार कार्ड, प्रत्येकाच्या नियमित स्वरूपात चालू असलेल्या औषधी गोळ्या, इत्यादी... सूचना देऊन, दिवाळी भाऊबीजे नंतर दोन दिवसांनी म्हणजे, बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी, शिवनेरी पेट्रोल पंप ओतूर, येथे सर्वांनी सकाळी आठ वाजता जमण्याचे ठरले.


लांबची सहल आणि विमान प्रवास या सर्वांच्या उत्साहामुळे आम्ही तर बरोबर वेळेपूर्वीच पाच मिनिटे, पेट्रोल पंपावर उपस्थित झालो. प्रवासाला जाण्याच्या उत्साहामुळे सर्वजण छान तयार होऊन, सोबत बॅग घेऊन, वेळेत येऊन बस मध्ये स्थानापन्न झाले होते. गणेशाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जय काराने, तर डॉ. एन. ए. बागुल सरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, मर्सिडीज बेंज कंपनीच्या व्हल्वो गाडीला सुंदर रंगीबेरंगी फुलांचा हार अर्पण करून, आणि जेटीएमपीएचे बॅनर हातात धरून, फोटो काढून प्रवासास सुरुवात झाली.


माळशेज घाटाचा, डोंगर-दऱ्यांचा सुंदर परिसर न्याहाळत प्रवास सुरु होता. विशेष म्हणजे, मागील छोट्या ट्रीप मध्ये मळमळ उलटीचा त्रास झालेल्यांना सुद्धा, या नागमोडी घाट रस्ता असलेल्या भागातून जाताना कसलाही त्रास झाला नाही. मुरबाड जवळ सर्वांनी फ्रेश होत चहा घेतला, आणि पुन्हा गाडीत बसल्यावर डॉ. अमोल चौधरी आणि ट्रीप सेक्रेटरी डॉ. युवराज ढमाले यांनी प्रत्येकाच्या हातात व्हेज बिर्याणी राईसचे पॅकेट दिले. बिर्याणी राईसचा स्वाद घेत घेत आमची गाडी बरोबर सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली.


उतरल्यावर लगेच आम्हाला डोक्यात घालण्यासाठी कॅप देण्यात आल्या. प्रत्येकाने आपापल्या बॅगा उतरून घेत, विमानतळावरील छान छान ठिकाणी फोटो सेशन करत व सेल्फी घेत आनंद व्यक्त केला. यानंतर आमचा मुंबई ते बँकॉक असा विमान प्रवास रात्री ११.४० वाजता, थाई एअरवेजने होणार होता. या मधल्या तीन तासाच्या वेळात काय करायचे हा प्रश्न लहान मुलांनी सोडवला.


प्रत्येकाने आपल्या आई-बाबांकडे हट्ट करून खेळण्यातील छोट्या छोट्या गाड्या व खाऊ मागून घेत, सर्व शॉप मध्ये त्यांना इकडे तिकडे फिरवले. त्यांच्या मागून फिरण्यामुळे, मोठ्यांच्याही पोटाला भुका लागल्या होत्या. विमानतळावरील सुंदर आलिशान हॉटेलमध्ये जाऊन सर्वांनी त्या भागवल्या. पुढे पासपोर्ट दाखवून बोर्डिंग पास घेत, बॅगा चेकिंगसाठी देत व सर्व सुरक्षा यंत्रणांना सामोरे जात, आमचा विमान प्रवास सुरू झाला.


सहा वाजून ४० मिनिटांनी आमचे विमान डॉन नुयाँग एअरपोर्ट, बँकॉक येथे उतरले. विमानतळावर विमान उतरत असताना...अंधाराचे साम्राज्य संपून गेले होते. त्याचबरोबर परदेशातल्या या बँकॉकच्या क्षितिजावर, तसेच सगळीकडे नाना आकाराच्या सोनेरी ढगांनी आभाळ व्यापले होते. निसर्गाने मुक्तहस्ते केलेली ही सोनेरी रंगांची उधळण मनाला हर्ष देऊन गेली.


पुन्हा सारे चेक आऊटचे सोपस्कार उरकून बाहेर पडलो. आणि... इथे विमानतळाच्या बाहेरच्या भागातच आम्हाला दोन तास अडकून पडावे लागले. खरं तर...इथं आम्ही ज्या ट्रॅव्हल एजन्सी बरोबर म्हणजे, जर्नीवाला डॉट. कॉम. टूर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक शिखर मल्होत्रा आणि असिस्टंट मॅनेजर प्रणव यांच्याबरोबर प्रवास करणार होतो, त्यांनी तेथे व्यवस्था केलेली बस दोन तासापर्यंत सुद्धा पोहोचली नव्हती. जेटीएमपीएचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भरत घोलप सर व डॉ. संजय वेताळ यांच्यासारख्या ट्रिपचा जबरदस्त अनुभव असणाऱ्यांनी फोनवरूनच खडसावल्यानंतर... शेवटी एकदाची बस येऊन थांबली.


बसमधून जर्नीवाला डॉट कॉमची, काठी वरची पाटी हातात घेऊन गोऱ्या रंगाची आणि छोट्या कुडीची थाई गर्ल, आमच्या समोर हजर झाली. माझे नाव, 'कुकी..' असे सांगत.. मला, 'कुकी किंवा कुकी मॅडम, असे काहीही म्हटले तरी चालेल' असे सांगत तिने स्वखर्चाने सर्वांना कॉफी पाजली, आणि सर्वांचा रागाचा पारा त्वरित खाली आला.


'सर्वांनी आपापल्या बॅगा डीकी मध्ये ठेवा, आणि जागेवर जाऊन बसा...' असे सांगून आता पुन्हा आपली सहल वेळेतच प्रत्येक ठिकाणी पोहोचेल, असे तिने सांगितले. आता यापुढे तुम्हीच वेळेत, प्रत्येक सिन पाहून, दिलेल्या वेळेत बसमध्ये या... आणि त्यानंतर खरोखर, टुरिस्ट गाईडने आणि टुरिस्ट एजन्सीने सर्व पाहण्याच्या ठिकाणांची, शोजची वेळ आणि बस यांची खूप सुंदर सांगड घातली.


संपूर्ण प्रवासात ही कुकी गाईड खूप कमी खाताना दिसायची. आणि तेही शक्यतो सॅलडच खायची. त्यामुळे त्यांचा गोरा रंग आणि तुकतुकीत कांती, हे थाई लोकांच्या आरोग्याचे रहस्य सांगायलाही ती विसरली नाही. अगदी सुरुवाती सुरुवातीलाच तिने आम्हा सर्वांना थाई भाषेतले महत्त्वाचे दोन तीन शब्द सांगितले. यामध्ये 'सवाडीका..' म्हणजे हॅलो! किंवा सुप्रभात! आणि 'कापूनका..' म्हणजे थँक्यू! धन्यवाद! असे ती प्रत्येक वेळी, दर दिवशी म्हणत असे. झाले... सहलीत काही बालकांनी 'कापूनका' चा महाराष्ट्रीयन अपभ्रंश 'कापून, खा..!' असा करून टाकला.


आमच्या ग्रुप मधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण तर तिला 'कुकीच..' म्हणत असत. व्यावसायिक गाईड असणारी ही कुकी चांगलीच बोलकी होती. गाडीत सर्वांची इंट्री झाली की... माइक मधून ती, गाडी किती वेळात कुठे पोहोचणार, आपण कोणकोणते पॉईंट्स पाहणार आहोत, शेजारी कोणती गावे, कोणते रस्ते आणि मॉल दिसत आहेत, याच्या सूचना देत असे.


४२ वय वर्ष असणारी कुकी अविवाहित होती. आणि अविवाहित असली तरी... तिला जर एखादा भारतीय आवडला तर, लग्न करायची तिची तयारी होती. फक्त तिची एकच अट होती, ती म्हणजे... तिच्या होणाऱ्या नवऱ्याने, तिच्या नावावर एक कोटी थाई बाथ जमा करावेत. एवढं सगळं सांगत असताना, एखाद्याचा चुकून हलकासा लागलेला धक्काही ती सहन करत नसे. आणि त्याशिवाय, 'माझे वडील पोलीस आहेत,' हे सांगायलाही ती कधी विसरली नाही.


बँकॉक वरून आमची डबल डेकर असणारी बस, दिड तास प्रवास करून पटायाला पोचली. वाटेत टायगर पार्कचे धिप्पाड, जिवंत, झोपलेले आणि मोकळे फिरणारे वाघ पाहून, सर्वांनी त्यांच्याबरोबर लांबून फोटो काढून घेतले. आणि त्यानंतर मनसोक्त व्हेज-नॉनव्हेज जेवणाचा आनंद घेतला. पाच वर्षापासून ते पंधरा वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींनी डबल डेकर बसचा तळमजला, बसण्यासाठी ताब्यात घेतला होता. वरच्या मजल्यावर येऊन... काव्या, सान्वी, स्वरा, आयुष, खुशी आणि अगस्त्य उर्फ बनी या सर्वांनी स्वखुशीने माइकचा ताबा घेऊन, सर्वांच्या आवडीची गाणी गायली. त्यात बनीचे...'संजूकडे, क्रेडिट कार्ड आहे' व 'गुलाबी साडी...आणि गाल लाल लाल...' ही गाणी खूप भाव खाऊन गेली.


त्यांच्या गप्पा, गाणी आणि मजा सुरूच होत्या. छोट्यांच्या तालावर साथ देत.. डॉ. सौ. मुक्तांजली पोथरकर, सौ. रंजना डुंबरे, डॉ. सौ. रश्मी घोलप, सौ. माधुरी देसाई, डॉ. भरत घोलप, डॉ. सौ. प्राची सुतार, डॉ. सौ. शिल्पा ढमाले या मोठ्यांनीही आपापल्या आवडीची गाणी गायली. पटायाला आमची बस...'एल. के. मिरॅकल' या हॉटेलवर पोचली, ज्या ठिकाणी पुढे आमचा तीन दिवसाचा मुक्काम होता. प्रत्येक फॅमिलीने येथे आपापल्या रूमच्या चाव्या घेऊन, थोड्या कालावधीसाठी विश्रांती घेतली आणि पुन्हा फ्रेश होऊन आमची बस, अल्काझार शो पाहण्यासाठी रवाना झाली. थाई कलाकारांचा उत्कृष्ट प्रतीचा डान्स, आणि त्याला तेवढ्याच अप्रतिम प्रकारच्या विद्युत रोषणाईचा, हा शो पाहून सर्वांची मने अचंबित झाली नसतील तर नवलच!


दुसऱ्या दिवशी आमचा प्रवास कोरल आयलँड येथे होणार होता. सकाळी दहा वाजताच टुर गाईडच्या सर्व सूचनांचे पालन करून, पटाया शहराचे आणि समुद्राचे फोटो काढत काढत, एका छोट्या बोटीवर आम्ही सर्वजण दाखल झालो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत बऱ्याच जणांनी पॅरासेलिंग करत व इतरांनी त्यांचे फोटो काढत, मनमुराद आनंद लुटला. रक्तदाब व हृदयरोग असणाऱ्यांना, बलून द्वारे हवेत उडण्याचा आनंद मात्र घेता आला नाही.

त्यानंतर कोरल आयलँड कडे जाण्याचे ठरले.


तिकडे जात असताना आमच्यातील डॉ. फापाळे यांची एक चप्पल, बोट क्रॉस करत असताना समुद्राच्या पाण्यात पडली. पडलेली चप्पल पुन्हा मिळेल या आशेने मात्र...त्यांनी गांधी स्टाईलने, एक चप्पल घालून काहीकाळ आंदोलन सुरू ठेवले होते, ज्याचे आम्ही फोटो काढले होते. वेगवान इंजिन बोटीने कोरल आयलँड कडे जाताना.. स्वच्छ, सुंदर, निळाशार समुद्र, निळेनिळे आकाश आणि छोटे छोटे हिरवेगार डोंगर पाहून, सर्वांची मने अगदी तृप्त होऊन गेली. आणि त्यानंतर अंडरवॉटर वॉक करताना... कानांना बसणारी दडी आणि नाकात जाणारे पाणी, यामुळे इतरांची होणारी तारांबळ पाहून, प्रत्येकाच्या मनात खरोखर धाकधूक वाढली.


ऑक्सिजनची नळी लावलेले २५ किलोचे वजनदार हेल्मेट डोक्यावर घेऊन पाण्यात उतरायचे, आणि २५ फूट पाण्याखाली जाऊन चालायचे... असा तो धाडसी प्रवास होता. आमच्या बरोबरच्या काही जणांनी हेल्मेट घालायलाच नकार दिला, काहींनी घातलेले हेल्मेट दोन फूट पाण्यात गेल्यानंतर काढून, हा नाद अर्धवट सोडला. हेल्मेट घालण्यापासून पाण्यात उतरवणे पर्यंत आणि पाण्यात चालण्यापासून ते वर सोडेपर्यंत प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी गार्ड होते. आमच्यासह खूप लहानग्यांनी सुद्धा हसून स्वागत करत, फोटो व व्हिडिओ साठी पोज देत, छोट्या छोट्या रंगीत माशांना त्यांचा खाऊ हाताने भरवत...पैसा वसूल परफॉर्मन्स केला. त्यानंतर सर्वांनी निळ्या स्वच्छ समुद्रकिनारी, पांढऱ्या लाटांमध्ये खेळण्याचा आणि फोटो काढण्याचा आनंद घेतला.


तिसऱ्या दिवशी आमची सहल टायगर पार्कला जाणार होती. इथे गेल्यावर सर्वप्रथम आम्हाला लांबून वाघ पहायला मिळाले. त्यानंतर रांगेने पुढे पुढे जात, पट्टेरी वाघांच्या पिंजऱ्यात आम्हाला सोडले गेले. आणि खरोखर स्वप्नवत वाटावे असे...वाघांच्या शेजारी उभे राहून, त्यांच्या पाठीवर हात फिरवून आणि चक्क वाघाची शेपटी हातात धरून उंच करत, आमचे प्रत्येकाचे फोटो काढले गेले. होय, हे सर्व वाघ..जिवंतच होते. जागे होते. आळस आणि जांभई देत होते, आणि.. गुरगरत सुद्धा होते. त्यांच्या तोंडाशी हातात छोटीशी छडी घेऊन, त्यांचा ट्रेनर उभा होता... म्हणून हे सारे शक्य झाले.


वाघाची शेपटी उचलताना, 'त्या बाजूला जास्त जाऊ नका नाहीतर तो फवारा उडवेल..' अशा सूचना आम्हाला अगोदरच दिल्या असल्यामुळे... आम्ही त्याच्या तडाख्यातून वाचलो, हे मात्र नक्की! आणि अभिमानाने वाघासोबतचे फोटो स्टेटसला लावल्यावर, मित्रांचे मेसेज सुरू झाले. कुठे गेला आहात? आणि हे खरोखरचे वाघ आहेत का?? वाघांबरोबरचे फोटोसेशन झाल्यावर, सायंकाळी जवळच असणाऱ्या जंगल सफारी कडे आम्ही वळलो. अच्छादलेल्या जाळीतून जाता जाता...डबल डेकर बस मधून पुन्हा आम्हाला मोकळे फिरणारे वाघ, सिंह, गेंडे, जिराफ, बगळे, बदक, पाणघोडे, करकोचे, रान रेडे आणि नील गाई खूप प्रमाणात दिसल्या. आणि आमचे सर्वांचेच.. काय पाहू आणि कितीकांचे फोटो काढू, असे नक्कीच झाले.


सकाळच्या वेळी लहान मुलांनी हॉटेलमधील स्विमिंगचा आनंद घेतल्यानंतर, वेळेवर आवरून तयार होत, पुन्हा बसने आम्ही बँकॉक कडे प्रस्थान ठेवले. यापुढील दोन दिवसांचा आमचा मुक्काम, 'गोल्ड ऑर्चिड हॉटेल' बँकॉक येथे होता. चौथ्या दिवशीचा सकाळचा आमचा प्रवास, जेम्स गॅलरी म्हणजे हिऱ्यांचा कारखाना पाहण्यात गेला. इथे हिऱ्यांना पैलू कसे पाडतात हे पाहण्यापासून, विक्रीसाठी हिरे उपलब्ध होते. लाख रुपयापासून ते आपल्याला आवडणाऱ्या छोट्या सेटची किंमत पाच कोटी एवढी होती. डॉ. भरत घोलप यांनी डॉ. रश्मी घोलप मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त, गळ्यातील सुंदर चेन आणि पेंडंट याठिकाणी घेतले होते. इतरांनी फोटोसेशन करत, सुगंधी अगरबत्ती खरेदी करत, या दालनाचा निरोप घेतला.


यानंतर स्थापत्यकलेचा सुंदर नजराणा असलेल्या बुद्ध टेंपलला सर्वांनी मनोभावे भेट दिली. त्यानंतर..जेवण उरकून उशीर झाल्यामुळे कपडे चेंज न करता, क्रुझर चुकू नये म्हणून..डायरेक्ट क्रुझरवर जावे की नको, अशा पेचात व्यवस्थापन सापडले होते. परंतु क्रुझवर जायचे म्हटल्यावर, सर्व आवरून, फोटो काढण्यासाठी छान कॉस्च्युम घालून नको का जायला?? असा प्रचंड आग्रह, स्त्री वर्गाने धरल्यावर, हॉटेलवर फक्त अर्धाच तास सर्वांना मिळाला. 'अर्धा तासात जे येतील, त्यांनाच घेऊन आम्ही पुढे जाऊ.' असे ठरले, आणि सर्वजण आश्चर्यकारक रित्या, अगदी वेळेत हजर झाले... कारण त्यानंतर आम्हाला 'चायो फ्रायो रिव्हर क्रूज' वर जायचे होते. या अति गर्दीच्या ठिकाणी आम्ही दीड तास लवकर पोहोचलो होतो.


छोट्या जहाजांचे आणि रंगीत लाईटचे अप्रतिम फोटो काढत, दीड तास कसा गेला ते कळले नाही. जहाजावर प्रवेश करताच, अल्पवेळेतच जहाज सुरू झाले. तळमजल्यावर एकीकडे अप्रतिम थाई डान्स सुरू झाला होता, तर दुसरीकडे जहाजाच्या खिडकीतून पाहताना...निळ्या प्रकाशात लाटांचे आणि पाण्याचे फवारे उडत होते. त्याचबरोबर भारतीय पद्धतीचे जेवण घेत, हा सर्व आनंददाई प्रवास नदीतून सुरू होता. आणि त्यानंतरच्या जवळ जवळ दोन तासांमध्ये किनाऱ्यावरील मंदिरांना, बंगल्यांना आणि इमारतींना अप्रतिम केलेल्या लाईट व्यवस्थेमुळे, सर्वांच्या डोळ्यांची अक्षरशः पारणे फिटली गेली. सर्वात वरच्या मजल्यावर सुद्धा, बॉलीवूडच्या तालावर डान्स सुरु होता. आमच्यातल्या कितीतरी डॉक्टरांनी या दोन तासात, घाम निथळेपर्यंत आणि दम लागेपर्यंत डान्सचा आनंद घेतला.


पाचव्या दिवशी आमचा प्रवास सफारी वर्ल्डला होणार होता. येथील मंकी शो, एलिफंट शो, डॉल्फिन शो, बर्ड शो, काऊबॉय शो पाहण्यात आणि मुलांसारखा आनंद घेण्यात गेला. एलिफंट शोमध्ये सुरुवातीला छोट्या मोठ्या हत्तींनी, लहान मुलांना सोंडेने उचलून घेतले व मोठ्यांनी त्यांचे फोटो काढले. छोट्या मोठ्या हत्तींनी फुटबॉल, बास्केटबॉल, चित्र काढणे, शंकराचा पिंडीला हार अर्पण करणे इत्यादी कला दाखवल्या. डॉल्फिन शोमध्ये विविध आकाराच्या डॉल्फिन्सनी, पाण्यातून उंच उड्या मारत व विविध कसरती करत प्रेक्षकांची आणि मुख्यतः लहानग्यांची मने जिंकली. काऊबॉय शो सुरू असताना तर... आपण प्रत्यक्ष एखाद्या चित्रपटाचे सलग, सुंदर शूटिंग पाहतो आहे, असे जाणवत होते.


बंदुकीतील गोळी लागल्यावर होणारे आवाज, त्यातून निघणारा धुर, माणसांचे उंचावरून पाण्यात पडणे, बॉम्ब गोळे पडल्यावर होणारे आवाज, त्यातून निघणारा जाळ, धूर आणि त्यातून होणारा विध्वंस डोळ्यांपुढे प्रत्यक्ष दिसत होता. खांद्यावरील रॉकेट लॉन्चरने हेलिकॉप्टर उडवणे... आणि त्याचा होणारा स्फोट.. प्रत्यक्ष युद्धभूमीची निर्माण झालेली परिस्थितीच आम्ही पहात होतो.


आता पुढे सफारी वर्ल्डला, प्राण्यांच्या पुतळ्यांच्या जगात आमचा प्रवेश झाला. या ठिकाणी अगदी हुबेहूब वाटतील असे, त्यांच्या नेहमीच्याच आकाराचे, रंगांचे आणि वेगवेगळ्या उंचीचे प्राणी म्हणजे... डायनासोर, झेब्रे, घुबडे, काळवीटे, हरणे, कोल्हे, डॉल्फिन आणि समुद्र मासे होते. त्याशिवाय खूप मोठी कॅक्टस पार्कही होती. या सर्व कृत्रिम प्राण्यांच्या जगात, प्रदूषणापासून दूर राहण्यासाठी, बॅटरीवर चालणाऱ्या उघड्या गाड्यांमध्ये फिरत, या सर्व सफरीचा मनसोक्त आनंद, असंख्य फोटो काढत आम्ही घेतला.


एक उदाहरण म्हणून सांगतो, यामध्ये फक्त डायनासोरचीच संख्या अंदाजे १००० असेल. आणि, हे सर्व पाहत असताना...ज्या कोणा इंजिनियरच्या मनातील ही संकल्पना असेल, त्याला आम्ही मनोमन सलाम केला.


आमचा शेवटचा सहावा दिवस होता. सर्व आवरावरी करून आणि बॅगा भरून आम्ही तयार झालो. हॉटेलच्या काउंटरवर चाव्या सुपूर्त करून, सर्वांनी भरपेट नाश्ता करून घेतला. त्यानंतर आम्हाला बँकॉक मधील सुप्रसिद्ध 'इंद्रा मार्केटमध्ये' शॉपिंगसाठी वेळ देण्यात आला होता.


सर्वांनी मुलांसाठी इलेक्ट्रॉनिक घड्याळे, महिलांनी इमिटेशन ज्वेलरी, पाहुण्यांना आणि मित्रांना देण्यासाठी वेगवेगळी चॉकलेट्स, सुगंधी अगरबत्ती आणि सर्वांसाठी कपड्यांची खरेदी...अगदी जंगी पद्धतीने केली. भारतापेक्षा तिकडे कपडे, इलेक्ट्रिनिक्स स्वस्त मिळतात. इंद्रा मार्केटमध्ये बार्गेनिंग करता येते, या सर्व जण सांगत असलेल्या ऐकीव बातम्यांचा परामर्ष आम्ही घेतला. दुपारचे जेवण उशिरा करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. डॉन नुयाँग एअरपोर्ट, बँकॉक येथे साडेपाच वाजता पोहोचलो.


सर्व सोपस्कार करून, संध्याकाळच्या प्रकाशात... इतर विमानांच्या उड्डाणांबरोबरचे फोटो काढत, सर्वांनी पुन्हा आनंदाने काही काळ घालवला. साडेआठ वाजताचे थाई विमान रात्री साडेअकरा वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. बसमध्ये पुन्हा व्हेज बिर्याणीचा आनंद घेत, आणि मध्ये मुरबाड नजीक महाराष्ट्रीयन पद्धतीचा चहा घेत रात्रीचा प्रवास सुरू राहिला.


पहाटे साडेसहा वाजता लहान मोठ्यांसह, सर्वजण ओतूरला सुखरूप पोहोचलो. या आंतरराष्ट्रीय प्रवासात ना कुणाला उलटी, ना कुठला प्रवासाचा त्रास. आणि आजारपण सुद्धा आले नाही. ही सहल यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी, ट्रिप सेक्रेटरी डॉ. अमोल चौधरी, डॉ. युवराज ढमाले, डॉ. जितेंद्र नायकोडी व डॉ. राहुल घुले यांनी संपूर्ण प्रवासात सर्वांची खूप काळजी घेत उत्कृष्ट नियोजन केले, त्याबद्दल सर्व जेटीएमपीए तर्फे त्यांचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन! आणि धन्यवाद! संपूर्ण प्रवासात आम्हा सर्वांना थायलंड देशाची वाहतूक व्यवस्था खूप आवडली. प्रत्येक ठिकाणी अगदी संथ गतीने सर्व वाहने जात होती.


प्रत्येक दोन वाहनांमध्ये सहा ते सात फुटाचे अंतर असायचे. झेब्रा क्रॉसिंगवर आपण रस्ता क्रॉस करत असलो तर आपण जाईपर्यंत सर्व चारचाकी वाहने एका जागी थांबून रहात असत, आणि, आश्चर्य म्हणजे या संपूर्ण सहा दिवसाच्या प्रवासात, कुठेही... हॉर्नचा आवाज आम्हाला ऐकू आला नाही. आहे ना आश्चर्य! बँकॉक पटायाला सहकुटुंब चालले आहात का?? असे आम्हाला सुरुवातीपासून विचारणाऱ्यांना, पर्यटनाला प्राधान्य देणाऱ्या या सुंदर देशाची सहल यशस्वीरित्या पूर्ण करून, आम्ही वाचनीय स्वरूपात घडवून आणली आहे.


डॉ. प्रविण डुंबरे, ओतूर

Comentarios

Obtuvo 0 de 5 estrellas.
Aún no hay calificaciones

Agrega una calificación

©2025 Neel Writes | All Rights Reserved

bottom of page