top of page

झांबर शेठ यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने स्व. श्रीकृष्ण रामजी तांबे यांच्यासारखे आमदार पुन्हा होणे नाही - डॉ. प्रविण डुंबरे

शिडशिडीत बांधा, उंच पुरे देखणे, पांढरे शुभ्र कपडे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आयुष्यभर जपलेले जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते, माजी आमदार स्व. श्रीकृष्ण रामजी तांबे उर्फ झांबरशेठ यांना जाऊन आज जरी पन्नास वर्षे झाली असली, तरी सुद्धा जुन्नर तालुक्यातील जनतेच्या मनात आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.



ओतूर गावचे सरपंच पद, ग्राम विकास मंडळ ओतूरचे अध्यक्षपद, जुन्नर तालुक्याचे सभापती पद, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जुन्नर तालुक्याचे आमदार पदही त्यांनी यशस्वीपणे भूषवले आणि जुन्नर तालुक्याचा खरोखर कायापालट झाला. जुन्नर तालुक्यातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तालुक्यात सर्वप्रथम ओतूर येथे त्यांनी सुरू केले..आणि संपूर्ण माळशेज पट्ट्यात ज्ञानाची गंगा त्यांच्यामुळे घरोघरी आली.


त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेला माळशेज घाट...याने तर जुन्नर आणि आजूबाजूच्या दोन-तीन तालुक्यांचा दळणवळणाचा संपर्क मुंबईशी झाला. याचा खूप मोठा फायदा परिसरातील शेती, उद्योग धंदे आणि मुंबईतील नोकऱ्यांसाठी, सर्वात जवळचा मार्ग म्हणून..परिसरातील सर्वच जनतेला झाला. समाजासाठी त्यांनी केलेले काम किती लोकाभिमुख होते...याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, जुन्नर तालुक्यातील गावागावात आणि वाड्या वस्त्यांवरील गोरगरीब जनतेच्या सुद्धा घरात, त्यांचे फोटो आजही पाहायला मिळतात.


झांबरशेठ गेले त्यावेळी मी फक्त सात वर्षाचा होतो. ओतूरच्या बाजारपेठेतील प्रचंड गर्दीत ट्रक वरून निघालेला त्यांचा अंत्यविधी.. आजही मला आठवतो आहे. त्यांच्या आणि आमच्या घरामध्ये फक्त बदगीच्या ओढ्याचे अंतर... त्यामुळे त्यांचे घरातील, राजफ्रुट प्रॉडक्ट्स मधील...ठाण्याचे माजी आमदार स्व. डी. के. राजर्षी व औषध दुकानदार स्व. वखारिया या मित्रांबरोबरचे लांबूनच पाहिलेले...उभे राहणे आणि बसणे कायमच स्मरणात राहिलेले आहे. खरोखर, असे निस्पृह आणि लोकहितवादी कार्य करणारे... स्व. श्रीकृष्ण रामजी तांबे यांच्यासारखे आमदार पुन्हा होणे नाही.🙏


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2025 Neel Writes | All Rights Reserved

bottom of page