ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय सर्पदंशतज्ञांचे प्रमुख योगदान: 'Venom and Toxins' परिषदेत डॉ. सदानंद आणि डॉ. पल्लवी राऊत यांचा सहभाग
- Neel Writes
- Aug 21, 2024
- 1 min read
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, यूके येथे 20 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान 'Venom and Toxins' (विष आणि विषाचे घटक) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेतील एक महत्त्वाचा सहभागी म्हणून भारतातील ख्यातनाम सर्पदंशतज्ञ डॉ. सदानंद राऊत आणि डॉ. पल्लवी राऊत यांना विशेष निमंत्रण मिळाले होते. या परिषदेचे आयोजन जागतिक स्तरावरील विषबाधा तज्ञ, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, संशोधक, आणि पॉलिसी मेकर्स यांच्या सहभागाने यशस्वीपणे पार पडले.
या परिषदेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यूके, युनिव्हर्सिटी ऑफ पडोवा इटली, युनिव्हर्सिटी ऑफ डेन्मार्क, लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन यूके, टेक्निकल युनिव्हर्सिटी डेन्मार्क, युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग यूके, एन वाय एन अडल्ट इन्स्टिट्यूट यूएसए, पाश्चर इन्स्टिट्यूट ऑफ मोरोक्को, युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया, इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅलेंसिया स्पेन, मरीन अँड एन्व्हायरमेंटल सायन्सेस सेंटर पोर्तुगाल, युनिव्हर्सिटी ऑफ पेरू, बर्नार्ड इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन जर्मनी, युनिव्हर्सिटी ऑफ ईस्वातीन, आणि युनिव्हर्सिटी ऑफ कोस्टारिका या विविध प्रतिष्ठित संस्थांमधील तज्ञ उपस्थित होते.
डॉ. सदानंद राऊत यांना विशेष निमंत्रण मिळण्याचे कारण म्हणजे त्यांनी नाग, मण्यार, आणि घोणस या विषारी सापांच्या दंशामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे. या परिषदेत त्यांनी "सर्पदंश होऊन श्वास बंद पडलेल्या (Respiratory Paralysis) किंवा हृदय व श्वास बंद (शॉक व cardiorespiratory arrest) पडलेल्या अतिगंभीर रुग्णांवर करावयाचे तातडीचे उपचार" या महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान दिले.
डॉ. पल्लवी राऊत यांनी "घोणसच्या दंशानंतर मेंदू व मज्जासंस्थेवर होणारे दुष्परिणाम" या विषयावर एक पोस्टर प्रेझेंटेशन सादर केले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतीय तज्ञांचा सहभाग हा भारताच्या विषबाधा उपचारातील प्रगतीचे द्योतक आहे, तसेच जागतिक स्तरावरील या विषयाच्या चर्चेत भारताची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित झाली आहे.
Comments