'अॅन इव्हिनिंग वीथ अॅकॉर्डियन' : अॅकॉर्डियन वादन कार्यक्रम
- Neel Writes
- Apr 28, 2023
- 2 min read
जागतिक अॅकॉर्डियन दिनानिमित्त आयोजन : अॅकॉर्डियन वादक अमित वैद्य यांसह देशभरातील कलाकारांचे सादरीकरण
पुणे : जागतिक अॅकॉर्डियन दिनानिमित्त 'अॅन इव्हिनिंग वीथ अॅकॉर्डियन' हा अॅकॉर्डियन वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दिनांक ६ मे रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कोथरुडमधील मयूर कॉलनीतील एमईएस बालशिक्षण मंदिर आॅडिटोरियम येथे कार्यक्रम होणार आहे. भारतातील चार दिग्गज अॅकॉर्डियन वादकांचा सहभाग असलेला हा वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती पुण्यातील अॅकॉर्डियन वादक अमित वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमाचे यंदा ७ वे वर्ष आहे. पुण्याचे अॅकॉर्डियन वादक अमित वैद्य यांसह गजानन नवाथे (पुणे), रवी बेन्ने (बंगळुरु), सागर साठे (मुंबई) हे देखील अॅकॉर्डियन वादन करणार आहेत. त्यांना पद्माकर गुजर व विनोद सोनावणे हे साथसंगत करणार असून डॉ. केतकी वैद्य या निवेदन करणार आहेत.

दरवर्षी दिनांक ६ मे हा दिवस जागतिक अॅकॉर्डियन दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो. परंतु भारतात २०११ पासून अॅकॉर्डियन दिन साजरा करण्यास वैद्य यांनी सुरुवात केली. या माध्यमातून दरवर्षी अॅकॉर्डियनचे विविध पैलू उलगडण्यात येतात.
यंदा अॅकॉर्डियनचा अंतर्भाव असलेली बॉलिवुडमधील सुवर्णकाळातील गाणी, पाश्चात्य फोक संगीत, अॅकॉर्डियन आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रयोग अशा प्रकारात सादरीकरण होणार आहे. वेगवेगळ्या वयोगटातील अॅकॉर्डियन वादक यंदा सहभागी होत असल्याने वेगवेगळ्या पद्धतीने संगीत व त्या वादकांचा प्रवास देखील जाणून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे.

अमित वैद्य म्हणाले, यावर्षी अॅकॉर्डियन हे वाद्य १९५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सन १८२९ मध्ये सायरिल डेमियन या आॅस्ट्रियन घडयाळ बनविणा-या माणसाने या वाद्याची बांधणी केली. वाद्य प्राथमिक स्वरुपात होते, मात्र त्याने या वाद्याचे पेटंट करीता अर्ज दिला होता, तो दिवस होता ६ मे १८२९ आणि म्हणूनच हा दिवस जागतिक अॅकॉर्डियन दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अॅकॉर्डियन आणि बॉलिवुडचा जवळचा संबंध आहे. अशा या वाद्याच्या व गीतांच्या प्रवासाची अनुभूती कार्यक्रमातून मिळणार आहे.
Comments